शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात; शिक्षकाचा मृत्‍यू

पाच ते सहा विद्यार्थी जखमी

। इंदापूर । वृत्तसंस्था ।

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शाळेच्या सहलीच्या बसची टेम्पोला धडक बसून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून पाच ते सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत.

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला आहे. या अपघातात शाळेचे शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरे शिक्षक रमाकांत शिरसाट हे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय या अपघातात काही विद्यार्थीही जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बावडा श्री शिवाजी विद्यालय शैक्षणिक सहल दि.19 रोजी रात्री गणपती पुळे येथे गेली होती. त्यानंतर आज गुरुवार दि.21 रोजी सहल पहाटे परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत सहलीची एस.टी. बस (एमएच-14-बीटी-4701) अकलूजच्या जवळ एका वळणावर बांबू घेऊन जाणारा टेम्पो पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा असताना पहाटेच्या वेळी टेम्पोचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 40 विद्यार्थी होते.

Exit mobile version