विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात दर शनिवारी दप्तराविना शाळा हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. शनिवारी शाळेत दप्तर न आणता विविध कार्यक्रम राबविता येणे शक्य आहे. त्यानुसार मार्च 2022 पर्यंत राबविण्यात येणार्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर घारे व शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार यांनी दिली.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कालावधीकरिता शाळा बंद होत्या. सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने विद्यार्थी शाळेत येत असले तरी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. तरी सुद्धा विदयार्थ्याच्या सर्वागिण विकासासाठी मर्यादा येत होत्या. ती उणिव भरून काढणे व सतत विदयार्थ्याना शिक्षण प्रवाहात सामावून घेणे आवश्यक असून, 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होत आहेत.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रेरणेतून आपल्या जिल्ह्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणेत येत आहे. सर्वागिण विकासासाठी चालना देण्यासाठी दर शनिवारी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. विदयार्थ्याना अभ्यासाचे ओझे न वाटता शिकण्यासाठी स्वयंप्रेरित करणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येक शनिवारी शाळेत दप्तर न आणता विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मार्च 2012 पर्यंत जे उपक्रम राबवावयाचे आहेत त्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिलेल्या नियोजित कृतीकार्यक्रमानुसार उचित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दप्तराविना शाळा उपक्रम नियोजन
दिनांक – उपक्रमाचे नाव
दि.4 डिसेंबर – उमलत्या कळ्या,दि.11 – चला करूया श्रमदान,दि.18 – माझी परसबाग, दि.25 – फिट इंडिया,दि.1 जानेवारी – माझा अभिमान,दि. 8 – मला समजले,दि.15 – मला सांगायचंय,दि.22 – चला पाहूया बोलक्या भिंती,दि.29 – मला सांगायचं,दि.5 फेब्रुवारी – माझा गाव माझा विकास,दि. 12 – ओळख माहिती तंत्रज्ञानाची,दि.18 – माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज,दि.26 – सर्वांसंगे हात धरू, सर्वंसंगे साथ चालू, राष्ट्रीय एकात्मता,दि.5 मार्च – माझ्या ताईचा मला अभिमान महिला सक्षमीकरण,दि.12 – माझी वसुंधरा,दि.19 जाणूू मोल पाण्याचे, काम करू पुनर्भरणाचे,दि.26 – करूया प्रसार आणि प्रचार व्यसनमुक्तीचा