सहा हजार शिक्षकांचे पुर्ण लसीकरणच नाही
चार हजार शिक्षकांना पहिला डोसही नाही
शाळा सुरु करण्याबाबत प्रश्नचिन्ह
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शासनाने दिलेल्या निर्देशानुसान इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग 1 डिसेंबर पासून संपूर्ण राज्यभरात सुरु करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यात देखील शाळा सुरु करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काय तयारी केली आहे याबाबतची अधिकृत माहिती उशिरा उपलब्ध झाली. जिल्ह्यात एकूण 20 हजार 169 शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पहिला डोस 16 हजार 362 शिक्षकांचा झाला असून 14 हजार 020 शिक्षकांनीच दुसराही डोस घेऊन लसीकरण पुर्ण करुन घेतले आहे. तर तब्बल 6 हजार शिक्षकांचे लसीकरण पुर्ण झालेले नसल्याने बुधवार पासून सुरु होणार्या शाळा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित आहेत की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रायगड जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या 2 हजार 108 शाळा असून 1 लाख 82 हजार विद्यार्थी आहेत. तर 10 हजार 669 शिक्षक आहेत. जिल्ह्यात दोन्ही डोस झालेल्या नागरिकांची संख्या कमी आहे. शिक्षण अधिकार्यांनी दिलेल्या माहिती नुसार रायगड जिल्ह्यात प्राथमिक विभागात 3 हजार 687 शाळा आहेत. त्यात 20 हजार 169 शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी कोरोना प्रतिबंधीत पहिला लसीचा डोस 16 हजार 362 तर दुसरा डोस घेऊन लसीकरण पुर्ण केलेल्या शिक्षकांची संख्या 14 हजार 020 इतकी आहे. त्यामुळे तब्बल 6 हजार 149 शिक्षकांचा दुसरा डोस व्हायचा असल्याचे त्यांचे लसीकरण पुर्ण झालेले नाही. अलिबाग तालुक्यातील 1 हजार 391 शिक्षक असून पहिला डोस सर्वांचा झाला असला तरी दुसरा डोस मात्र 973 शिक्षकांनीच घेतला आहे. कर्जत मध्ये 1 हजार 578 पैकी 1 हजार 225 शिक्षकांचा पहिला तर 1 हजार 126 शिक्षकांचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. खालापूरमध्ये 1 हजार 485 शिक्षकांपैकी 1 हजार 124 पहिला तर 984 शिक्षकांनी दुसरा डोस घेतला आहे. महाड 1 हजार 484 पैकी पहिला डोस 1 हजार 036 जणांचा तर 910 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. माणगाव 1 हजार 299 पैकी 670 पहिला तर 587 दुसरा डोस पुर्ण झालाय. म्हसळा तालुक्यात 457 शिक्षकांपैकी 392 जणांनी पहिला तर 423 जणांचा दुसरा डोस पुर्ण झालाय. मुरुडमध्ये 509 शिक्षकांपैकी 426 शिक्षकांचा पहिला तर 354 शिक्षकांनी दुसरी डोस घेतला आहे. पनवेल मध्ये 6 हजार 467 शिक्षकांपैकी 5 हजार 458 जणांनी पहिला तर 4 हजार 772 जणांचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. पेण तालुक्यात 1 हजार 251 पैकी 1 हजार 066 शिक्षकांचा पहिला तर 871 जणांचा दुसरा डोस झाला आहे. पोलादपूरात 439 शिक्षकांपैकी 446 जणांनी पहिला तर 399 शिक्षकांनी दुसरा डोस पुर्ण केला आहे. रोहा तालुक्यात 1 हजार 327 शिक्षकांपैकी 1 हजार 050 शिक्षकांचा पहिला तर 865 शिक्षकांचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यात 557 पैकी 521 शिक्षकांचा पहिला तर 456 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सुधागडात 597 पैकी 457 शिक्षकांनी पहिला तर 401 शिक्षकांचा दुसरा डोस पुर्ण झालाय. तसचे तळा तालुक्यातील 313 शिक्षकांपैकी 212 जणांनी पहिला तर 194 शिक्षकांनी दुसरा डोस घेतला आहे. उरण तालुक्यात 1 हजार 015 शिक्षकांपैकी 888 शिक्षकांनी पहिला डोस घेतला असून फक्त 705 शिक्षकांनीच दुसराही डोस घेऊन लसीकरण पुर्ण केले आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यातील शिक्षकांचे पुर्णपणे लसीकरण झालेले नसल्याने शाळा सुरु कशा पद्धतीने सुरु करणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.