| पुणे | प्रतिनिधी |
राज्यातील सध्याची कोरोना बाधित रुग्णसंख्या लक्षात घेता पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच पालकांना आपले मूल सुरक्षित राहील, अशी खात्री वाटत असेल, तरच त्यांनी मुले शाळेत पाठवावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्यातील कोरोना नियम शिथिलतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. सध्या कोरोना आकडेवारी घट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. तसेच ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराचेही रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध घातले होते. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्या जानेवारीच्या दुसर्या आठवड्यानंतर वेगाने ओसरू लागल्यानंतर 24 जानेवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यात आल्या. पालकांकडून संमतीपत्र घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. तसेच जे पालक आपल्या पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवत नाहीत, त्यांच्याकरिता दृकश्राव्य माध्यमातून शाळा सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र, मुंबईतील कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे ओसरत असल्यामुळे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये कोरोनाचा संसर्ग देशभरात सुरू झाल्यानंतर बंद करण्यात आलेल्या शाळा दोन वर्षांनी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. यावेळी अपंगांच्या व विशेष मुलांच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना बाधित रुग्णांचा दर कमी असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ, टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा करून आता 1 मार्चपासून जम्बो रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.