जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश; कुंडलिका, पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली
| रायगड | प्रतिनिधी |
भारतीय हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर व कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे गुरुवार (दि.१९) रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुट्टीचे आदेश जारी केले आहेत.
हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली. बुधवारी (दि.18) रात्रभर पावसाने आपली दमदार बॅटिंग सुरू ठेवली होती. यामुळे अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर तालुक्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने अलिबाग, रोहा, तळा,महाड आणि पोलादपूर तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि खालापूर तालुक्यातील पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
प्रशासनाचा सुट्टीचा संदेश सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सर्व शाळांपर्यंत पोहचला. तो पर्यंत सकाळी भरणाऱ्या शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली होती. विद्यार्थ्यांनी मुसळधार पाऊस असतानाही शाळा आणि महाविद्यालये गाठली होती. शाळा सुरू झाल्याने शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापन आणि पालकांची तारांबळ उडाली होती. यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार शाळांना सुट्टी द्यायची होती तर ती शाळा सुरू होण्यापूर्वी द्यायला हवी होती. असा सूर पालकांमधून ऐकावयास मिळत होता.







