कमी पटाच्या शाळा बंद करु नये ः आ. तटकरे

माणगाव | प्रतिनिधी |

शासनाने राज्यातील 0 ते 5 पटसंख्या असणा-या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंद होणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत केले जात आहे. मात्र, रायगडसह कोकणातील भौगोलिक परिस्थिती पाहता ते शक्य नाही. यास्तव शाळांमधील विद्यार्थी इतर शाळांमध्ये समायोजन न करता, आहे त्याच शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्याविषयी शासनाने निर्णय घ्यावा. यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मंत्रालयात रायगड माजी पालकमंत्री तथा आ. अदिती तटकरे यांनी लेखी निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.    
प्रत्यक्षात शाळा बंद होत नसली तरी विद्यार्थ्यांना मात्र जवळच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगराळ भाग असल्याने जवळच्या शाळेत जातानासुद्धा विद्यार्थ्यांची पायपीट होणार आहे. काही ठिकाणी डोंगरावर राहणारे विद्यार्थी रोज पायपीट करून खाली येऊ शकत नाहीत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वस्तीपासून शाळेपर्यंत येण्यासाठी रस्त्यांची सोय नाही. यासाठी आपण स्वत: लक्ष घालून 0 ते 5 पटापर्यंतच्या शाळा बंद न करता त्यांच्या मूळ शाळेतच शिक्षण मुलांना द्यावे, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version