| अलिबाग | प्रतिनिधी |
जागतिक विज्ञान दिनानिमित्त सृजन प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय कुरुळ येथे विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले. जलपातळी नियंत्रक, छोटे चित्रपटगृह, हवेचा दाब व घनता यावर आधारित विविध प्रयोग, श्वसन संस्थेची प्रतिकृती, अरविंद गुप्ता यांच्या म खेळ विज्ञानाचेफ या पुस्तकातील मनोरंजक खेळ इत्यादि अनेक प्रयोग सादर केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे प्रयोग पाहण्यासाठी पालकांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी सर्व पालकांचे स्वागत केले. या प्रयोगांमधून विद्यार्थ्यांना व पालकांना प्रयोगशाळेतील विविध उपकरणे व त्यांचे उपयोग, विज्ञानातील मूलभूत संकल्पना यांची माहिती मिळाली. पालकांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका अनुपमा चवरकर, मेघना केळकर, सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सृजन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मानसी पाटील, शिक्षिका सुषमा पाटील, सोनल पाटील, सुनाक्षी पाटील, समीक्षा ठाकूर यांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर उपक्रमास अभिनय क्षेत्रातील कलाकार श्रध्दा पोखरणकर , त्यांची कन्या वेणू, पीएनपी महाविद्यालयातील प्राध्यापक केतकी पाटील- गुरव, सिद्धेश गुरव यांनी आवर्जून भेट दिली.