| चिरनेर | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील मुलांसोबत अंकुर प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. विद्यार्थ्यांना भाषा, गणित, विज्ञान, स्कॉलरशिप व इंग्लिश स्पिकिंग यावर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, त्यांचे संवाद कौशल्य वृद्धिंगत व्हावे याउद्देशाने जागतिक महिला दिनाचे व विज्ञान दिनाचे औचित्य साधून आदिवासी व ग्रामीण भागातील मुलांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण आदिवासी भाषेतील प्रयोगाचे विश्लेषण करणारे विद्यार्थी हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य जगदीश डंगर, सामाजिक कार्यकर्ते पंकज म्हात्रे व निखिल गावंड यांनी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण केले. मुलांमध्ये इंग्रजीचे संवाद कौशल्य सुलभ व्हावे, या उद्देशाने देशपांडे फाऊंडेशन व अंकुर प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एसआयव्हीचा प्रकल्प इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो. या विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय स्पेल बी स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या.
विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक राजिप शाळा प्रधानवाडी, द्वितीय क्रमांक राजिप शाळा कोलेटी आणि तृतीय क्रमांक राजिप शाळा बोरकस यांनी पटकावले. स्पेल बी स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवीमध्ये दक्ष संतोष पाटील यास प्रथम, तर हर्षद कैलास पाटील यांस द्वितीय, इयत्ता सहावीमध्ये जिग्नेश संतोष भोईर यांस प्रथम, तर निळ हेमंत तांबोळी यास द्वितीय आणि इयत्ता सातवीमध्ये स्वराज कैलास खंडागळे प्रथम, तर रसिक महेश घरत यांस द्वितीय क्रमांक प्राप्त झाले. सर्व विजयी स्पर्धकांना अंकुर प्रकल्पकडून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गिफ्ट देण्यात आले.
अंकुर प्रकल्पाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन
