। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायशेत येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान जत्रा 2022 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा तसेच विज्ञान प्रतिकृतींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी ऑनलाइन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सी. बी. रमण यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. मानवी जातीचा विकास घडविण्यासाठी संशोधन वृत्ती गरजेची असून, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढविल्यास मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक क्रांती निर्माण होईल, असा आशावाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सोमवारी नियोजित कार्यक्रमात व्यक्त केला. बालकांना वैज्ञानिक बनण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान असून, सातत्यपूर्ण मूल्यमापन करता आले पाहिजे. बालकांमध्ये दैनंदिन कामकाजात शोधवृत्ती गरजेची असून, त्यांना प्रत्येक बाबीत निरीक्षण नोंदविता आले पाहिजे, असे मत डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषदेमार्फत शिक्षणासंदर्भात दर शनिवारी राबविण्यात येणार्या दप्तराविना शाळा उपक्रमासह स्मार्ट शाळा उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे पवार, अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनचे प्रतिनिधी भूषण रॉय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख रमाकांत पाटील, मुख्याध्यापिका श्रध्दा पाडगे, प्रमोद पाटील, अशोक पाटील, निकिता पाटील, मेघनाथ पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक संदीप वारगे यांनी केले.
मानवी जातीचा विकास घडविण्यासाठी संशोधन वृत्ती गरजेची असून, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढविल्यास मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक क्रांती निर्माण होईल.- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद







