विज्ञान एकांकिका स्पर्धा उत्साहात

लोकमान्य विद्यालय नवघरने पटकवला प्रथम क्रमांक

| मुंबई | प्रतिनिधी |

शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच त्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मिराभाईंदर येथे विज्ञान एकांकिका (नाट्य) स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ग्रंथाली प्रतिभांगण, मराठी एकीकरण समिती (एक लोकचळवळ) आणि मिराभाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह मीरारोड पूर्व याठिकाणी स्पर्धेचे उद्घाटन झाले.

या स्पर्धेत मिराभाईंदर शहरातील महानगरपालिका तसेच खाजगी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण 20 विज्ञान एकांकिका सादर करण्यात आल्या. विज्ञान विषय नाट्याच्या माध्यमातून सोप्या, रंजक व प्रभावी पद्धतीने मांडताना विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि सादरीकरण कौशल्य प्रभावीपणे दाखवून दिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच विज्ञानाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित होते, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

स्पर्धेच्या निकालात प्रथम क्रमांक लोकमान्य विद्यालय, नवघर, भाईंदर (पूर्व) यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक आदर्श विद्यानिकेतन, काशिगाव, मिरा रोड(पूर्व) तर, तृतीय क्रमांक मीराभाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक 6, खारीगाव, भाईंदर(पूर्व) यांनी मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिके मीराभाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक 22, मूर्धा तसेच शाळा क्रमांक 14, पेणकर पाडा यांनी पटकावली. सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version