क्षुल्लक कारणावरुन एकावर कैचीहल्ला

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील वावळोली येथे मंगळवारी (ता.14) सायंकाळी पालीतील ओसवाल प्लाझात राहणारे कृष्णा दिघे (50) यांना वावळोली येथील फाळे पितापुत्राने हाताबुक्क्याने मारहाण करून पुत्राने कैचीने भोसकून जखमी केले आहे.

याबाबत पोलीस प्राथमिक माहिती अहवालातून (एफआरआय) मिळालेली सविस्तर माहिती अशी, की कृष्णा दिघे यांच्या वावळोली येथील जागेला लागून संजय फाळे यांची जागा आहे. या जागेसंदर्भात दिघे व फाळे यांच्यात वाद सुरू आहेत. या जागेत संजय फाळे टपरी बांधण्याचे काम करीत होते. यावेळी दिघे यांनी त्यांना या वादग्रस्त जागेत बांधकाम का करतो, अशी विचारणा केली. याचा राग येऊन संजय फाळे यांनी कृष्णा दिघे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्याचवेळी फाळे यांच्या मुलाने कृष्णा दिघे यांच्या पाठीत कैची भोसकून त्यांना पाईपवर ढकलले आणि दोघांनी दिघे यांना हाताबुक्क्याने मारहाण केली.

जखमी कृष्णा दिघे पाली पोलीस ठाण्यात तक्रात दिली आहे. प्रथम त्यांना उपचारासाठी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथून अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. फुफ्फुसाला इजा व अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याने दिघे यांना तेथून कोपरखैरणे येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. चव्हाण करीत आहेत. मुख्य आरोपीला अजूनही अटक झाली नसल्याने आमच्या जीवाला धोका आहे, असे दिघे कुटुंबियांनी सांगितले.

Exit mobile version