अपघातात स्कूटरस्वार जागीच मृत्यू

| पोलादपूर | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील चोळई येथील सुंदरराम मोरे महाविद्यालयासमोरील साईडपट्टीलगत बुधवारी सायंकाळी एका स्कूटरस्वाराला धडक देऊन अज्ञात वाहनाने पोबारा केला आहे. या अपघातात स्कूटर साईडपट्टीजवळ घसरल्यानंतर मागील बाजूने भरधाव वेगाने आलेल्या वाहनाखाली स्कूटरस्वाराचे डोके चिरडले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

या अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव सोहेल साळुंके (26) आईचे नाव फरीदा साळुंके असून, तो ठाणे शहरातील कळवा येथील जयदीप अपार्टमेंटच्या मागील ताकोली मोहल्ला येथील साळुंके निवासातील खोली क्रमांक 3 मधील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली. यावेळी तो ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा मुंब्रा येथून रत्नागिरी येथे स्कूटरवरून प्रवासाला निघाल्याची माहिती प्राप्त झाली. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये युवकाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलीस अज्ञात वाहनाचा तपास करीत आहेत.

Exit mobile version