| नारंगी | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस उरल्याने गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, शहरासह ग्रामीण भागातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये लगबग वाढली आहे. विविध आकारांच्या आकर्षक गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविला जात असून, रंगकाम, सजावट, मुकुट, दागिने आणि नक्षीकाम पूर्ण करण्यासाठी कारागिरांची दिवसरात्र धावपळ सुरू आहे.मापगावातील साई-प्रसाद कला केंद्रात गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी कारागिरांची लगबग वाढली आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी विविध आकारांच्या व आकर्षक स्वरूपातील गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. यंदाही घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांसाठी मूर्ती तयार करण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. सुरुवातीला मातीपासून मूर्तीचा सांगाडा तयार करून त्यावर बारीक नक्षीकाम करण्यात आले. त्यानंतर मूर्तीला आकार देणे, वाळविणे, रंगकाम आणि अंतिम सजावटीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गणरायाला आकर्षक रूप देताना कारागीर मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळे, मुकुट, हातातील आयुधे तसेच वस्त्रालंकार याकडे बारकाईने लक्ष देत आहेत. मूर्ती अधिक सुंदर व देखणी दिसावी यासाठी विविध रंगछटा आणि पारंपरिक सजावटीचा वापर केला जात आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्याने मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये कामाचा वेग वाढला आहे. तयार झालेल्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, ग्राहकांकडून मूर्तींची आगाऊ नोंदणीही केली जात आहे.
‘बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरल्याने कामाचा वेग वाढविला आहे. मूर्तीची घडण, रंगकाम आणि सजावट यातील प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पूर्ण केला जात आहे. भक्तांच्या पसंतीस उतरतील अशा सुंदर आणि आकर्षक मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न आहे.’
विलास राणे,
साई-प्रसाद कला केंद्र, मापगांव
