मूनवली येथे शिल्पकलांचे प्रदर्शन

प्रदर्शन पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी

| सोगाव | वार्ताहर |

छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालय मुंबई यांचे प्राचीन शिल्पकलांचे अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात भारत, इजिप्त, असेरिया, ग्रीस, रोम या देशातील प्राचीन काळातील शिल्प यांची प्रतिकृती असलेल्या शिल्पकला यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे नियोजन मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी उत्तमरित्या केले. हे प्रदर्शन सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मोफत पाहता येईल याची व्यवस्था करण्यात आली होती.

या शिल्पकला छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, परंतु या शिल्पकला व प्राचीन संस्कृती यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना मुंबई येथे जाऊन पाहणे व माहिती घेणे सर्वांनाच शक्य होत नाही. यासाठी या वस्तुसंग्रहालयातर्फे बसमध्ये प्राचीन संस्कृती, शिल्पकलांच्या लहान प्रतिकृतीचे प्रदर्शन मोफत पाहता यावे, यासाठी बसमधून गावोगावी जाऊन प्रदर्शन भरवुन माहिती दिली जात आहे, असे बस पथक अधिकारी शांतिनी सुतार यांनी सांगितले. तसेच यापुढील काळात रायगड जिल्ह्यातील इतर गावागावांमध्ये जाऊन या प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्राचीन काळातील संस्कृती व शिल्पकलांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या प्रदर्शनाद्वारे आमच्या मूनवली व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्राचीन काळातील शिल्पकला व प्राचीन संस्कृतींची माहिती मिळाली. मुंबईसारख्या शहरात जाऊन घेणे शक्य झाले नसते, ती सुविधा छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालया मुंबईतर्फे गावात येऊन माहिती दिली.

-सचिन घाडी
सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version