जिल्हा आरोग्य प्रशासन लागले कामाला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात हत्तीरोगाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने आता पावले उचलली आहेत. जिल्ह्यात हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून गृहभेटीद्वारे रुग्ण शोधण्याचे काम गावपातळीवर वेगाने सुरु करण्यात आले आहे. हत्तीरोगाची धास्ती कमी करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
क्युलेक्स या डासामार्फत हत्तीरोग होतो. या डासांच्या चाव्याद्वारे होणारा हा गंभीर रोग आहे. शरीराच्या अवयवांमध्ये जास्त सूज येते. रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून हत्तीरोगाचे 236 रुग्ण असून, त्यांच्यावर वेळेवर उपचार केले जात आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा हिवताप विभागाकडून वारंवार जनजागृती केली जाते. हत्तीरोग रुग्णांची वेळोवेळी तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या आजाराला रोखण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यात 16 ऑगस्टपासून हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात गृहभेटी सुरु करण्यात आल्या आहेत.
हत्तीरोगाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशा व स्वयसेवकांच्या मदतीने गृहभेटीद्वारे तपासणी करण्यात आली. घरोघरी जाऊन नागरिकांना भेटून त्यांच्यामध्ये या आजाराबाबत जनजागृती करून त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. हत्तीरोग असल्यास त्याची माहिती घेण्याचे कामही यंत्रणेमार्फत सुरु केले आहे. आरोग्य कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात गृहभेटी करून हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम राबवित आहेत. कंटेनर सर्वेक्षण करून डोसोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, नाले, गटारे वाहती करणे, ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून धूर फवारणी केली जात आहे. हत्तीरोग रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हिवताप विभागाने कंबर कसली आहे. ही मोहीम 31ऑगस्टपर्यंत राहणार आहे.
नागरिकांनो, काळजी घ्या!
जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवणे, गटारे, नाले वाहते करणे, घराच्या बाजूला न वापरती भांडी, टायर्स यांची योग्य विल्हेवाट लावणे, शौचालयाच्या व्हॅट पाईपला जाळी बांधावी, खिडक्यांना जाळी लावाव्यात, डास होणार नाही याची काळजी घ्यावी. हत्तीपाय व अंडवृद्धी आजाराची माहिती देऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्विनी सपकाळ यांनी केले.
हत्तीरोग म्हणजे काय?
फायलेरिया (हत्तीरोग) हा क्युलेक्स मॅनसोनियाची लागण झालेल्या डासांच्या चाव्याद्वारे होणारा एक गंभीर रोग आहे. हे लिम्फॅटिक सिस्टमला नुकसान करते. जर ते रोखले नाही, तर शरीराच्या अवयवांमध्ये जास्त सूज येऊ शकते.
डॉक्टर सांगतात..
हत्तीरोग रुग्णांनी तीव्र लक्षणे टाळण्यासाठी पायांची किंवा बाधित अवयवांची साबण आणि पाण्याने स्वच्छता ठेवावी. पायाच्या आकाराप्रमाणे चपला घालाव्यात. पायाला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखावी.
क्युलेक्स डासांची उत्पत्ती कुठे होते?
तज्ज्ञांच्या मते, क्यूलेक्स प्रजातीचे डास दूषित पाणी आणि घाणीच्या जागी मोठ्या प्रमाणात वाढतात. हे डास पडक्या इमारती, नाल्यांच्या बाजूला असणारी घरे या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.





