पनवेल तालुका पोलिसांनी कामगिरी
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील वलप गाव परिसरातून तीन तरुणी ज्यामध्ये दोन अल्पवयीन व एक सज्ञान या राहत्या घरात कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्या होत्या. याबाबतची तक्रार त्यांच्या पालकांनी पनवेल तालुका पोलिसांना करताच अत्यंत शिताफीने व तांत्रिक तपासाच्या आधारे या तीनही मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर तीन मुली या घरातून कोणास काहीएक न सांगता कोठेतरी निघून गेल्या आहे. याबाबतची तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक भोईर व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंधारे यांनी तात्काळ सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपास करून दोन मुलीना बदलापूर येथून व एका अल्पवयीन मुलीस ठाणे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करता त्या तिघी जणी आपले वेगळे आयुष्य व आई-वडिलांचे कोणतेही बंधन नसावे याकरिता परस्पर घरातून निघून गेल्याचे त्यांनी मान्य केले. तात्काळ केलेल्या तपासामुळे सदर तिन्ही मुलींचा यशस्वीरित्या शोध घेता आला व त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात सुखरूपपणे देता आले. यावेळी त्यांच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते व सदर पालकांनी पनवेल तालुका पोलिसांचे मनापासून आभार मानले.





