। आगरदांडा । प्रतिनिधी ।
दक्षिण आफ्रिकेसह जगातील इतर काही देशांमध्ये कोव्हिड-19 चा घातक ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्यामुळे देशात करोनाची नवीन लाट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने मुरूड तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, नगरपरिषद, पंचायत समिती, मेरीटाईम बोर्ड, हॉटेल-चालक-मालक व पर्यटन स्थळ भागातील सर्व सरपंच यांच्या बरोबर सभेचे आयोजन मुरुड तहसीलदार कार्यालय करण्यात आले होते. ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढविणारे आहे. त्याकरिता हॉटेल, लॉजिंग व व्यापारीवर्ग व नागरिकांनी सतर्कत राहुन सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार-गोविंद वाकडे यांनी यावेळी केले. सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या यांनाच परवानगी असणार आहे. तसेच पर्यटन स्थळावर विशेष काळजी घेऊन पर्यटकांना नविन कोव्हिड नियमांचे पालन करण्यास विनंती करावी अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. या सभेकरिता मुरूड तहसीलदार गोविद वाकडे, नायब तहसीलदार रविंद्र सानप, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पोलिस उपनिरीक्षक रेखा जगदाळे, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष वाणी, बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी, आरोग्य अधिकारी संजय दुबे, वैद्यकीय अधिकारी मुरूड विद्या सोनम, नगरपरिषद आरोग्य अधिकारी राकेश पाटील, सरपंच हिरकणी गिदी, रामकृष्ण आगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.