अल्पवयीन मुलाचा अवघ्या 24 तासात शोध

| पनवेल । वार्ताहर ।

कामोठे सेक्टर 11 मधुन हरवलेल्या अल्पवयीन मुलाला कामोठे पोलिसांनी अवघ्या 24 तासात शोधून त्याच्या कुटूंबाकडे सुपूर्त केल्याची कौतुकास्पद कामगिरी केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीवर शुभेच्छाचा वर्षाव होऊ लागला आहे.

कामोठे सेक्टर 36 येथील शिवसंकल्प को-ऑपरेटीव सोसायटीमध्ये राहणार्‍या पियुष संतोष जाधव (वय 15) हा नेहमी प्रमाणे आपल्या शाळेतून तो घरी आला. त्यानंतर तो कामोठे सेक्टर 11 मधील एका खाजगी क्लासला गेला. मात्र क्लास सुटल्यानंतर तो घरी आलाचा नाही. त्यामुळे घाबरलेल्या पियुषच्या पालकांनी कामोठे पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची तक्रार दिली. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पारखे यांच्या पोलीस पथकांनी पियुषचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसी टीव्हीच्या माध्यमातून शोध घेत असताना पोलिसांना पियुष मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालताना दिसून आला. मात्र पुढे पियुष गेला कुठे हे पोलिसांना माहिती मिळणे कठीण झाले होते. त्यानंतर कामोठे पोलिसांनी रेल्वे पोलिसाच्या मदतीने पियुषचा शोध सुरू केला असता पियुष सीएसटी स्टेशनच्या बाहेर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर कामोठे पोलिस सीएसटी स्टेशनच्या दिशेने रवाना झाले आणि पियुषचा शोध सुरू केला.

शोधादरम्यान पियुष हा रेल्वे स्टेशनला बसल्याचे पोलिसांना दिसून आले. त्या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या आई वडिलांकडे सुपूर्त केला. आपला मुलगा सुखरूप मिळाल्याने मिळाल्याचे पाहून जाधव कुटुंबाने कामोठे पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

Exit mobile version