पोलादपूर नगरपंचायतीची घरपट्टी वाढीबाबत गुपचूप जनसुनावणी?

| पोलादपूर | प्रतिनिधी |

नगरपंचायत पोलादपूरच्या अन्याय्य घरपट्टीवाढी विरोधातील मोर्चेकरी नागरिकांना मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी दिलेल्या पत्राला त्यांनी स्वत:चे केराची टोपली दाखवित घरपट्टी वाढीबाबतच्या हरकती घेणाऱ्या काही मोजक्याच मालमत्ताधारकांच्या मुलाखती घेऊन गुपचूप जनसुनावणी सुरू असल्याची माहिती मिळताच. पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयात धाव घेऊन नगररचनाकारांसह मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षा यांच्या उपस्थित सुरू असलेल्या जनसुनावणीच्या कामकाजाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली.

नगरपंचायतीने लादलेल्या वाढीव घरपट्टीसंदर्भातील आंदोलनानंतर मोर्चेकऱ्यांना मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी लेखी पत्राद्वारे कलम 107 द्वारे नवीन नगराध्यक्षा पदावर बसताच जनरल मिटींगचा ठराव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्याचे आश्वासित केले होते. मात्र, अशाप्रकारचा ठराव करण्यात आला आहे अथवा कसे, याबाबतची माहिती कार्यकर्ते दर्पण दरेकर यांच्या अर्जानंतर देण्यात आली नाही. बुधवार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी काही निवडक हरकती घेणाऱ्यांच्या हरकतींवर नगररचनाकारांच्या प्रमुख उपस्थितीत गुपचूप जनसुनावणी घेण्यात आली. मात्र, याबाबत वृत्तपत्रामध्ये प्रसिध्दी तसेच नगरपंचायतीच्या सुचना फलकावर नोटीस लावण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. तथापि, 99 टक्के पोलादपूरकरांना या जनसुनावणीची माहिती पोहोचविण्यात आली नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यासाठी पोलादपूर नागरिक समस्या निवारण मंचाच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक प्राण्यांपासून नागरिकांना सुरक्षितपणे जगण्याच्या अधिकाराला बाधा निर्माण होत असल्याबद्दल नगरपंचायतीचे न्यायालयाचा अवमान होण्याइतपत अक्षम्य दूर्लक्ष झाल्याचे मुख्याधिकारी शिपाई यांच्यासह नगररचनाकारांच्या निदर्शनास आणून दिले. त्याकडे विशेष लक्ष देण्याऐवजी मुख्याधिकारी आणि नगरपंचायत नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा घरपट्टीवाढीच्या जुलमी कराबाबत आग्रही असल्याच्या लोककल्याणविरोधी भूमिकेचा उहापोह करण्यात आला.

Exit mobile version