प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पापांचा बळी जाण्याची वाट पाहताय का?
25 दिवस उलटले, तरीही प्रशासन सुस्त!
| पनवेल | प्रतिनिधी |
एकीकडे डिजिटल इंडिया आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाळा पक्षी अभयारण्याजवळ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने ज्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केले आहे, तिथे गेल्या 25 दिवसांपासून सुरक्षा बॅरिकेड्स तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत. प्रशासनाचा हा निर्लज्जपणा एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
कर्नाळ्याच्या या धोकादायक वळणावर भीषण अपघात होऊन लोखंडी बॅरिकेड्स उखडले गेले आहेत. आज 10-12 दिवस नाही, तर तब्बल 25 दिवस उलटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला याची साधी दुरुस्ती करण्याची सवड मिळालेली नाही. पनवेलकडून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने या वळणावर सुसाट असतात. अशा वेळी नियंत्रण सुटलेले वाहन थेट विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर घुसून निष्पापांचा बळी घेऊ शकते. शासकीय दप्तरी हे ठिकाण ब्लॅक स्पॉट आहे, म्हणजेच इथे अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तरीही अशा संवेदनशील ठिकाणी उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने डोळ्यावर कातडे ओढले आहे. “प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर” (प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला) हे ब्रीदवाक्य फक्त कागदावरच मर्यादित राहिले असून, प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना मृत्यूच्या छायेत प्रवास करावा लागत आहे.
जर उद्या या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाला आणि त्यात कुणाचे प्राण गेले, तर त्याचे पाप कोणाच्या पदरात पडणार? सुस्त प्रशासन की संबंधित ठेकेदार? केवळ टोल वसुलीमध्ये धन्यता मानणाऱ्या रस्ते विकास महामंडळाला या तुटलेल्या बॅरिकेड्समुळे होणारा धोका दिसत नाही का? प्रशासनाने या बातमीची तातडीने दखल घेऊन 24 तासांच्या आत या बॅरिकेड्सची दुरुस्ती करावी, अन्यथा होणाऱ्या कोणत्याही जीवितहानीला सर्वस्वी शासन आणि संबंधित विभाग जबाबदार असेल, असा इशारा संतप्त वाहनचालकांनी दिला आहे.
