खारघरच्या मैदानात सुरक्षेचा बोजवारा

सुरक्षारक्षक केबिन जळून खाक

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघर येथील खेळाच्या मैदानातील सुरक्षारक्षक केबिनला आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. या मैदानात लहान मुले आणि नागरिकांची नियमित वर्दळ असतानाही सुरक्षारक्षक नियुक्त नसल्याचे या घटनेने पुन्हा समोर आले आहे. वारंवार मागणी आणि पत्रव्यवहार करूनही पनवेल महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांनी केला आहे.

खारघर सेक्टर 19 मधील प्लॉट क्रमांक 132 येथील केबिनला आग लागल्याची माहिती मिळताच नेत्रा पाटील यांनी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अतुल मोहकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित यंत्रणेला घटनास्थळी पाठवून आग विझविण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र, या घटनेने सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. विशेष म्हणजे, खारघरमधील विविध खेळाच्या मैदानांवर सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, यासाठी नेत्रा पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे यापूर्वीच वारंवार पत्रव्यवहार केला होता. तरीही प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. अखेर सुरक्षेसाठी उभारलेली केबिनच आगीत जळून खाक झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे खारघरमधील सर्व खेळाच्या मैदानांवर तातडीने सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, जळालेल्या केबिनची पुनर्बांधणी करावी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version