मुंबई हादरली! सात वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतील पायधुनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका इमारतीमध्ये वॉशरुमसाठी गेलेल्या 7 वर्षीय निष्पाप मुलीवर तेथील सुरक्षारक्षकाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

घटनेची माहिती मिळताच शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने थेट पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ केला. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पीडित बालिका इमारतीच्या वॉशरूममध्ये गेली असताना नराधम सुरक्षारक्षकाने तिच्यावर हल्ला केला. या पाशवी अत्याचारामुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या वैद्यकीय पथकाकडून तिच्यावर अतिदक्षतेखाली उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version