सुरक्षा रक्षक मानधनाविना

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

मुंबई येथील 26/11 च्या सागरी दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. सागरी किनार्‍यांवरील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली. परंतु रात्रीचा दिवस करून काम करणारे सुरक्षा रक्षक सहा महिन्यांपासून रखडले आहेत. गणपती, नवरात्र व दिवाळी मानधनाविनाच गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक संकट उभे राहिले आहे. याकडे मत्स्य विभाग लक्ष देईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबईमधील दहशतवादी हल्ले समुद्रमार्गे झाले आहेत. देशविघातक कारवाया रोखण्यासाठी, किनार्‍यावरील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी गृह विभागाने पावले उचलली. किनार्‍यांवरील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी किनारी सुरक्षा रक्षक नेमण्यास सुरुवात झाली.

रायगड जिल्हा मुंबईच्या अगदी जवळ असल्याने समुद्र मार्गे दहशतवादी हल्ले होण्याचा धोका नाकारता येत नाही. रायगड जिल्ह्यात 1992 मध्ये श्रीवर्धनमधील शेखाडी येथील सागरी किनारी आरडीएक्स सापडले होते. त्यानंतर काही महिन्यापूर्वी श्रीवर्धनमध्ये समुद्रमार्गे शस्त्रांचा साठा आढळून आला होता. अशा काळ्या घटनांनी रायगडमधील किनारे परिचित आहेत. रायगड जिल्हयातील किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी पेणमधील दादर, ओएनजीसी पिरवाडी, रेवस जेट्टी, मांडवा परिसरातील आरसीएफची जुनी जेट्टी, मांडवा, नवगांव अलिबाग, रेवदंडा, आग्राव, कोर्लई, बोर्ली मांडला, नांदगांव, एकदरा, राजपूरी, आंबेत, बागमांडला, मांदाड, शेखाडी, जीवना, दिघी पॅसेंजर, दिघी पोर्ट अशा अनेक बंदरावर खासगी 69 जणांची नियुक्ती करण्यात आली. पाच सुपरवायझर व 64 सुरक्षा रक्षक या बंदरावर रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत.

समुद्रालगत फिरणार्‍या संशयीत बोटींवर लक्ष देऊन त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देणे. खलाशी यांचे आधार कार्ड तपासून त्यांची नोंदणी करणे. मासेमारीला जाणार्‍या बोटींना टोकन देणे अशा अनेक प्रकारची कामे सुरक्षा रक्षक करीत आहेत. पोलिसांसह मत्स्य विभागाला मदतीचा हात देणार्‍या सुरक्षा रक्षकांना चार महिन्याचे मानधन मिळाले नाही. जून महिन्यांपासून हे कर्मचारी मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव तसेच आता दिवाळीचा सणही मानधनाविनाच साजरा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शासनाकडून निधीच उपलब्ध झाला नसल्याचा फटका या सुरक्षा रक्षकांना बसला आहे. मानधन नसल्याने या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. उसनवारी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत सुरक्षा रक्षकांना मानधन मिळावा यासाठी शासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून निधी आल्यावर मानधन देण्याची कार्यवाही केली जाईल, असे मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले.

स्टेशनरी खर्चाचाही अभाव
जिल्हयातील 21 ठिकाणी 69 सुरक्षा रक्षक तीन टप्प्यात काम करीत आहेत. रात्रीच्यावेळी किनार्‍यांवरील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी टॉर्चची गरज असते.तीदेखील त्यांना दिली जात नाही. प्रत्येक महिन्याला स्टेशनरी खर्च देण्याच्या सुचना आहेत. तो खर्चदेखील दिला जात नसल्याचे सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले आहे.

सागरी आतंकवादी हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक म्हणून आमची नेमणूक करण्यात आली आहे.किनार्‍यांवरील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच बोटींना टोकन देणे, त्यांची नोंदणी ठेवण्याचे काम केले जाते. जून महिन्यांपासून मानधन दिले नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कर्जाचे हप्ते थकले आहेत. कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने मत्स्य विभागाने मानधन द्यावा अशी मागणी आहे.

सुरक्षा रक्षक
नाव न सांगण्याच्या अटीवरून
Exit mobile version