| नवी मुंबई | प्रतिनिधी |
एमटीएनएल मुंबईत कार्यरत सुरक्षा रक्षकांना मागील अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. मे 2025 पासूनचे 5 महिन्यांचे वेतन थकीत आहे. यापूर्वीही नोव्हेंबर-डिसेंबर 2024 व जानेवारी-एप्रिल 2025 च्या वेतनात प्रचंड विलंब झाला होता. सुरक्षारक्षकांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी सजग नागरिक मंच, नवी मुंबई यांच्याकडून बृहन्मुंबई व ठाणे सुरक्षा रक्षक मंडळाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, सुरक्षारक्षकांचे नियुक्तीकरण, सेवा शर्ती व वेतन देणे ही संपूर्ण जबाबदारी मंडळाची आहे. नियमानुसार सुरक्षारक्षकांना शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे किमान वेतन व इतर भत्ते वेळेवर देणे बंधनकारक आहे. वेतन नियत तारखेला न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी जबाबदारी येते. ठेकेदारी पद्धतीत नियुक्त कामगारांचे वेतन वेळेवर न दिल्यास ठेकेदारासोबतच मुख्य नियोक्ता व मंडळ जबाबदार धरले जाते. तसेच, पगाराकरिता मिळालेली रक्कम थकवणे अथवा विलंब करणे हा गंभीर गुन्हा ठरतो. तसेच, तात्काळ कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गांचा अवलंब करू, इशारादेखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सजग नागरिक मंचच्या मागण्या
सुरक्षारक्षकांचे सर्व थकित वेतन तात्काळ वितरित करावे, प्रत्येक महिन्याचे वेतन निश्चित तारखेला दिले जावे, एमटीएनएलकडून निधी उशिरा मिळाल्यास मंडळाने स्वतःच्या निधीतून वेतन द्यावे, मंडळाने विशेष वेतननिधी तातडीने तयार करावा, अन्यथा मंडळाविरुद्ध महाराष्ट्र सुरक्षा रक्षक अधिनियम, व कलम 406 अंतर्गत कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
सुरक्षा रक्षक हे सार्वजनिक संस्थांचे रक्षण करतात. त्यांना महिनोन्महिने वेतन न देणे हे अन्यायकारक, अमानवी व बेकायदेशीर आहे. मंडळाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल.
– सजग नागरिक मंच, नवी मुंबई







