नोकरी एक संधी म्हणून पाहा

किशोर जैन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

| नागोठणे | वार्ताहर |

शिक्षण घेऊनही तरूण-तरुणींना नोकरीसाठी वणवण करावी लागते. मात्र, तंत्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या संधी चालून येत असतात. अशीच एक संधी खोपोली येथील गार्गी हुटन्स अल्बर्टस्‌‍ या कंपनीने नागोठणे आयटीआयमधील विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे मिळालेल्या नोकरीच्या वेतनाकडे न पाहता, ती एक संधी म्हणून पाहा, असे मार्गदर्शन नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी नागोठणे आयटीआयमधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केले.

नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी (दि.26) परीक्षापूर्व घेण्यात आलेल्या मुलाखतीत एओसीपी या ट्रेडचे 11 विद्यार्थ्यांची खोपोली येथील कंपनीसाठी शिकाऊ कामगार (ॲप्रेंटिस) म्हणून निवड झाली. त्यावेळी या विद्यार्थ्यांना किशोर जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. त्यावेळी बोलताना जैन यांनी विद्यार्थ्यांना अनमोल व दिशादर्शक असे मार्गदर्शन केले. याच वेळी पर्यावरणाचा संदेश वृद्धिंगत करीत यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रा. व्ही.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमाला खोपोली येथील गार्गी हुटन्स अल्बर्टस्‌‍ या कंपनीचे एच.आर. विभागाचे प्रमुख राजेश बागवे, प्रॉडक्शन मॅनेजर सुहास क्षीरसागर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक एस.एस. भगत, महाड आय.टी.आय. मधील कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार निलेश नरे, एओसीपीचे गटनिदेशक एस.डी. बाईत, विजतंत्रीचे गटनिदेशक पी.पी. पाटील, एम.एम.सी.पी.चे गटनिदेशक एन.जे. वारे, महाड आयटीआयमधील एओसीपीचे गटनिदेशक एच.ए. मुंडले आदींसह इतर गटनिदेशक व विद्यार्थी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version