खरीप हंगामासाठी बियाणे-खते उपलब्ध

। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध असून त्याची टंचाई जाणवणार नाही. शेतकर्‍यांनी भात आणि नागली रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल आल्याशिवाय आणि पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दि.17 जून 2022 अखेर सरासरीच्या 8 टक्के पाऊस झाला आहे. भात, नागली, वरी या प्रमुख तीन पिकांसाठी पेरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. 17 जून पर्यंत भात पिकाची 64 टक्के क्षेत्रावरील रोपवाटिकांची लावणी झाली असून नागली पिकाची 24 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी सांगितले.तसेच पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही श्रीमती बाणखेले यांनी केले आहे. महाबीजकडून संकरित आणि सुधारित वाणांच्या बियाणे एकूण 5 हजार 436 क्विंटल तर खासगी 14 हजार 990 क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. तसेच खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्यात एकूण 20 हजार 20 मेट्रीक टन उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी खते, बियाणे, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून निविष्ठांची खरेदी करावी असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

Exit mobile version