निर्बीजीकरणासाठी भटक्या कुत्र्यांची धरपकड

कर्जत नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम


| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांकडून दंश केला जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कर्जत नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.पालिकेच्या या मोहिमेत पहिल्या दिवशी तब्बल 26 कुत्र्यांना पकडण्यात भरारी पथकाला यश आले. कर्जत शहरातील अनेक भागात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत होता. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील नागरिकांनी कर्जत नगरपरिषदेला तक्रारी केल्या होत्या.

शहरात काही ठिकाणी एकावेळी किमान 15-20 कुत्र्यांचे कळप दिसून येऊ लागल्याने शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना बाहेर एकटे सोडायला पालक घाबरु लागले. त्यामुळे पालिकेवर दबाव वाढू लागल्याने आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मान्यतेने भटके कुत्रे आणि मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे तात्काळ निर्बीजीकरण करण्याच्या उपक्रमाला मान्यता देण्यात आली. पालिकेचे त्यासाठी आपल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी एक कक्ष निर्माण करून घेतला. त्याचवेळी शहराच्या विविध भागात भटके आणि मोकाट कुत्रे पकडण्यासाठी निविदा काढून प्रामुख्याने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे उद्दिष्ट नक्की केले.

कर्जत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने काढलेल्या निवेदेला प्रतिसाद देऊन आलेल्या रिगल कंपनीच्या कामगारांनी कामाचे कार्यादेश मिळाल्यानंतर संध्याकाळी मोकाट कुत्र्यांना पकडण्याची कार्यवाही सुरु केली. पहिल्या दिवशी कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठ भागात या पथकाने तब्बल 26 कुत्रे पकडले. त्यासाठी सहा तरुणांचे पथक जाळी घेऊन मोकाट कुत्रा बाजारात दिसताच कार्यवाही केली. शहरात बाजारपेठ भागात ही कारवाई करताना भटक्या कुत्र्यांना पकडून टेम्पोत भरण्यात येत होते. उद्यापासून शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांना पकडण्याची कार्यवाही हे पथक करणार आहे. या पथकाने पकडलेल्या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे नेण्यात आले.तेथे त्यांच्यावर निर्बीजीकरण प्रक्रिया केली जाणार आहे. पहिल्या दिवशी या पथकाने 22 मोठी आणि चार लहान कुत्र्यांना जेरबंद केले आहे. कर्जत नगरपरिषदेच्या या भटके कुत्रे विरोधी कार्यवाहीमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version