‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ साठी रायगडातील पाच शाळांची निवड

जिल्हा परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन करणार अंमलबजावणी;
शिक्षणाधिकार्‍यांची जिल्हा परिषद शाळांना दिली भेट

| अलिबाग | प्रतिनिधी |

ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील पाच शाळांची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 व गुणवत्तापूर्ण शिक्षण निधीतून आदर्श शाळा निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरण स्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण, आनंदाची शिक्षण इत्यादी उद्दिष्टांवर कार्य सुरू आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावातील शाळांमध्ये या अभियानाची अमंलबजावणी जिल्हा परिषद व ग्राम सामाजिक परिवर्तन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अक्षय पाटील, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये तसेच अन्य सदस्यांनी अलिबाग तालुक्यातील खानाव तसेच मुरूड येथील नांदगाव व चोरढे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली.

यावेळी संबंधित तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी देखील उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक विकास अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांची स्तुती करून या कामांकरिता जिल्हा परिषदेमार्फत सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

या अभियानात प्रामुख्याने शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, आनंददायी शिक्षण आणि पर्यावरण पूरक शाळा या पाच महत्त्वपूर्ण विषयांवर काम सुरू आहे. या कामास गती देण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक विकास अभियानातर्फे मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील 4 शाळांकरिता कामे करण्यात आलेली होती. यावर्षीदेखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील दोन शाळा, मुरुड तालुक्यातील दोन शाळा व सुधागड तालुक्यातील एक अशा एकूण 5 शाळांची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version