| नागपूर | प्रतिनिधी |
दुबई येथे बुधवारी (दि.24) सुरू झालेल्या आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी 60 खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून त्यात महाराष्ट्राच्या सात ॲथलिट्सचा समावेश आहे. ही स्पर्धा दि. 27 ते 31 ऑगस्ट या कालावधीत लिमा (पेरू) येथे होणाऱ्या जागतिक ज्युनिअर स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धाही आहे. गेल्या वर्षी कोरियात झालेल्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्णपदकांसह 19 पदके जिंकली होती.
भारतीय संघात महाराष्ट्राच्या गौरव भोसले (पुणे), निखिल ढाके, अनुष्का कुंभार, प्राची देवकर (सातारा), रुजुला भोसले, साक्षी चव्हाण, सिया सावंत (मुंबई) यांचा समावेश आहे. गौरव हा माजी आंतरराष्ट्रीय धावपटू भास्कर भोसले यांचा मुलगा असून त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होय. तो 3000 व 5000 मीटर शर्यतीत सहभागी होईल.
अनुष्का ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या बाबतीत अनुभवी असून ती 400 मीटर हर्डल्स व 4-400 मीटर रिले शर्यतीत सहभागी होणार आहे. तिने यापूर्वीही ज्युनिअर, युवा आशियाई व जागतिक ज्युनिअर स्पर्धेत भाग घेतला आहे. रुजूला, साक्षी व सिया या तिघी 4-100 मीटर रिले शर्यतीत सहभागी होतील.