तिनविरा येथील मनश्री शेडगेची भारतीय हॉकी संघात निवड

| अलिबाग | भारत रांजणकर |
जपान येथे 2 ते 11 जून दरम्यान होत असलेल्या महिला ज्युनिअर आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी अलिबाग तालुक्यातील तिनविरा गावातील मनश्री नरेंद्र शेडगे हिची भारतीय हॉकी संघात आशिया ज्युनियर मुलींच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिची निवड झाल्याबद्दल संपूर्ण रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातून तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. यापूर्वी मनश्रीने महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले होते. जपानमध्ये 2 जूनपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या महिला कनिष्ठांच्या आशिया चषक 2023 च्या हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने बुधवारी 18 सदस्यांचा भारतीय महिला कनिष्ठ हॉकी संघ जाहीर केला. यात मनश्री शेडगे हीचा देखील समावेश केला आहे.

जपानमधील होणाऱ्या या आगामी स्पर्धेत भारताचा अ गटात समावेश असून कोरिया, मलेशिया, चीन तैपेई आणि उझ्बेकिस्तान या संघांचा सहभाग आहे. तर ब गटात यजमान जपान, चीन, कझाकस्तान, हाँगकाँग, इंडोनेशिया यांचा समावेश राहिल. जपानमध्ये होणाऱ्या या आगामी स्पर्धेतील पहिले तीन संघ 2023 साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचे उपकर्णधारपद दीपिकाकडे सोपवण्यात आले आहे.

या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 3 जूनला उझ्बेकबरोबर, दुसरा सामना मलेशियाबरोबर 5 जूनला, तिसरा सामना 6 जूनला कोरियाबरोबर, तसेच चौथा सामना चीन तैपेईबरोबर 8 जूनला खेळवला जाईल. या स्पर्धेतील उपांत्य सामने 10 जूनला तर अंतिम सामना 11 जूनला आयोजित केला आहे.

असा असेल संघ
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ गोलरक्षक- माधुरी किंडो, आदिती माहेश्वरी, बचावफळी- महिमा टेटे, प्रिती (कर्णधार), निलम, रोपनीकुमारी, अंजली बरवा, मध्यफळी- ऋतुजा पिसाळ, मंजू चोरसिया, ज्योती छत्री, वैष्णवी फाळके, सुजाता कुजूर, मनश्री शेडगे, आघाडीफळी- मुमताज खान, दिपिका (उपकर्णधार), दीपिका सोरेंग, अणू, सुनेलिता टोप्पो.

चरी येथे घेतले प्राथमिक शिक्षण
अलिबाग तिनवीरा गावची युवा खेळाडू असलेली मनश्री नरेंद्र शेडगे ही पहिल्यापासूनच अनेक खेळांमध्ये तरबेज होती. त्यामुळे शासनाच्या ग्रामीण भागातील होतकरू व गुणवंत क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाअंतर्गत तिला हॉकी प्रशिक्षणाची संधी मिळाली. या संधीचे सोने मनश्रीने केले आहे. मनश्रीचे प्राथमिक शिक्षण चरी येथे झाले असून त्यानंतर ती पुण्यामध्ये पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिला हॉकीचे धडे मिळाले. गेल्याच वर्षी महाराष्ट्राच्या कर्णधारपदी मनश्रीची निवड करण्यात आली होती. तिथे केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेत तिची निवड राष्ट्रीय संघात करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पोहचताच अलिबाग तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात समाजमाध्यमांवरुन मनश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे.

Exit mobile version