| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेल्या क्रीडा संबंधांमुळे पाकिस्तानने येत्या नोव्हेंबर-डिसेंबर (2025) मध्ये भारतात होणाऱ्या पुरुष ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) शुक्रवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अलीकडील दहशतवादी हल्ले आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील बिघडलेले संबंध. भारताचे नवीन धोरण ज्यामुळे द्विपक्षीय (बायलॅटरल) क्रीडा स्पर्धांवर निर्बंध आले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान हॉकी महासंघाने (पीएचएफ) खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत माघार घेतली आहे. पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय स्पर्धेतून माघार घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बिहारमधील राजगीर येथे झालेल्या पुरुषांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेतूनही पाकिस्तानने माघार घेतली होती. त्रयस्थ ठिकाणाची मागणी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा चुकवू नये, यासाठी पाकिस्तान हॉकी महासंघ (पीएचएफ) आता स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाण (न्यूट्रल वेन्यू) मिळावे, यासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडे (एफएचआय) मागणी करत आहे. ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत चेन्नई आणि मदुराई येथे होणार आहे. स्पर्धेत पाकिस्तानला भारत, चिली आणि स्वीत्झर्लंडसह ब गटात आहेत. या स्पर्धेतून पाकिस्ताने माघार घेतल्यामुळे आता त्यांच्या जागी कोणत्या संघाचा समावेश करण्यात येणार याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल. भारताने पाकिस्तानसोबत द्विपक्षीय सामने न खेळण्याचे धोरण ठेवले असले, तरी बहुराष्ट्रीय (बायलॅटरलत) स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे, असे असूनही पाकिस्तानने माघार घेतल्याने दोन्ही देशांतील क्रीडा संबंध अधिक तणावाचे बनले आहेत.







