| रसायनी | प्रतिनिधी |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने आयोजित विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय आणि दमदार कामगिरी करून आपली छाप पाडली आहे.
मुंबई विभाग स्तरीय स्क्वॅश स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात सोनिया वाघमारे हिने सुवर्णपदक पटकावले असून तिची व साहिल वाघमारे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच रायगड जिल्हा व खालापूर तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्येही चौक शाळेच्या संघांनी चमकदार कामगिरी केली आहे.
खो-खो स्पर्धा :
14 वर्षाखालील मुले व मुली – प्रथम क्रमांक
17 वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक
17 वर्षाखालील मुली द्वितीय क्रमांक
19 वर्षाखालील मुले व मुली द्वितीय क्रमांक
कबड्डी स्पर्धा :
14 वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक
17 वर्षाखालील मुले द्वितीय क्रमांक
याशिवाय मैदानी स्पर्धांमध्येही शाळेच्या खेळाडूंनी 14, 17 व 19 वर्षाखालील वयोगटात एकूण 12 सुवर्ण, 16 रौप्य आणि 8 कांस्य पदके मिळवत शाळेचा झेंडा उंचावला आहे. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक शरद कुंभार सर यांनी प्रशिक्षित केले असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्या प्रसारिणी सभा चौक संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.अविनाश देशमुख, शोभा देशमुख, नरेंद्र शहा, योगेंद्र शहा तसेच सर्व शिक्षकांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







