| पनवेल | वार्ताहर |
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा आणि के.व्ही. कन्याशाळा समितीच्या चेअरमनपदी शाळेचेच माजी विद्यार्थी आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ संजय पाटील यांनी गुरुवारी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
या अगोदर प्रीतम म्हात्रे यांनी शाळेच्या माध्यमिक विभागाचे शाळा समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते अध्यक्ष असलेल्या जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या ग्रामीण भागात त्यांच्या स्वतःच्या शाळासुद्धा आहेत. ज्यामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा स्वरूपात शिक्षण सेवा दिली जाते. त्यांनी आजपर्यंत कोकण एज्युकेशन सोसायटीचे शाळा समिती सदस्य म्हणून केलेले काम आणि त्यांचा शिक्षण क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव पाहता त्यांची नियुक्ती करण्यात आली. शाळेत शिकलेला विद्यार्थी मोठा झाल्यावर त्याने केलेल्या कार्याच्या जोरावर त्याच शाळेत जेव्हा चेअरमन म्हणून येतो तेव्हा हा सन्मान त्या विद्यार्थ्यांचा नसून त्याला घडवणाऱ्या शिक्षकांचा, त्या शाळेचा आणि त्याच्या आई-वडिलांचा असतो अशा प्रकारे भावना आज पनवेलकर व्यक्त करत आहे.
माझे बाबा जे.एम. म्हात्रे यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीमुळे माझ्यासारखेच अनेक तरुण विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत आहेत. काम करताना ते निस्वार्थीपणे केले पाहिजे असे ते नेहमी सांगतात त्याचीच पोचपावती आज मला माझ्याच शाळेच्या चेअरमनपदी नेमणूक झाल्याबद्दल मिळाली असे मी समजतो. समस्त पनवेलकरांना अपेक्षित असलेली आपली शाळा आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये एक वेगळा उच्चांक गाठेल अशा प्रकारे सर्व सहकाऱ्यांना घेऊन मी भविष्यात काम करणार आहे.
प्रीतम म्हात्रे,
महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते







