माणगावची तृणाली शाहची नासामध्ये निवड

रायगडची पहिली तरुण संशोधक विद्यार्थिनी

| माणगाव । सलीम शेख ।

माणगाव शहरातील विकास कॉलनी येथे राहणारी तृणाली अनिल शाह या तरुणीची ज्युनिअर शास्त्रज्ञ म्हणून अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या अंतराळ संशोधन संस्थेमध्ये नुकतीच निवड करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर निवड झाल्याने तिचा अशोकदादा साबळे प्रतिष्ठानतर्फे अ‍ॅड. राजीव साबळे यांनी माणगाव भूषण पुरस्कार देऊन गौरव केला. लवकरच ती जपान येथे प्रशिक्षणासाठी प्रयाण करणार आहे. अशा प्रकारे नासामध्ये निवड होणारी तृणाली ही रायगड जिल्ह्यातील पहिली आणि महाराष्ट्रातील दुसरी तरुण संशोधक ठरली आहे.

तृणाली शाह दि. 1 नोव्हेंबरपासून जपान येथील नागोया विद्यापीठात गेस्ट रिसर्चर म्हणून पाच महिने संशोधक म्हणून काम करणार आहे. त्यानंतर ती अमेरिकेतील नासा या मुख्य संशोधन केंद्रातील कार्यालयात हजर होणार आहे. या प्रशिक्षण काळात तृणाली पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील प्रभावाचा मानवी जीवनावरील होणारे परिणाम यावर संशोधन करणार आहे. या दोघांमधील अंतरिक्ष परिणामाने पृथ्वीवरील जीवसृष्टीवर सूक्ष्म आघात होत असल्याने जीपीएस कार्यप्रणालीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. इंधन वाहिन्यांवर दुष्परिणाम होऊन त्यांची गळती होते. या दोन्ही प्रक्रिया निरंतर सुरू राहण्यासाठी संशोधन करणार आहे.

दक्षिण आणि उत्तर धृव या चुंबकीय क्षेत्रात असणार्‍या जगातील देशांमधील वेगवेगळ्या डान्सिंग लाईट दिसणार्‍या सूर्याच्या सूक्ष्म कणांच्या भूचुंबकीय प्रदेशातील घटनांचा अभ्यासपूर्ण माहितीचे संकलन करून संशोधन करणार आहे. हे डान्सिंग लाईट आपल्याकडे दिसणार्‍या इंद्रधनुष्यसारखे परंतु डोळ्यांचे पारणे फेडणारे वेगवेगळ्या आकाराचे असतात. ते पहाटे दिसत असतात. मात्र, आपल्याकडे दिसत नाहीत. तसेच भारताने प्रक्षेपित केलेले, सूर्याजवळ गेलेल्या ‘आदित्य एलवन’चा अभ्यास करणार आहे.

अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या तृणालीचे बारावी विज्ञानपर्यंतचे शिक्षण माणगाव येथे झाले. त्यानंतर पुणे आणि मुंबई विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण भौतिक शास्त्र या विषयात पूर्ण केले. त्यानंतर अंतराळ हवामान या विषयात स्पेस केंद्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जीओ मॅग्नेटिझम या संशोधन संस्थेत पीएचडी केली आहे. त्यानंतर तिला पोस्ट डॉक्टरेट पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत राहणार आहे. तृणालीचे वडील अनिल शाह यांना आपल्या मुलीने इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे करावे म्हणून अवकाश संशोधन हा विषय निवडून तिला मोबाईलवर असंख्य व्हिडिओ आणि निरीक्षणं अभ्यास करण्यासाठी देत असत. त्यामुळेच तिला लहानपणापासूनच अंतराळ संशोधनाची आवड निर्माण झाली होती. त्यासाठी वडील अनिल, काका दिनेश, भाऊ राज आणि सर्वच शाह परिवाराने भरपूर प्रोत्साहन दिले. यामुळे तृणालीचे खर्‍या अर्थाने स्वप्न साकार झाल्याने तिला आकाश ठेंगणे झाले आहे.

Exit mobile version