| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ आणि अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानतर्फे स्व. माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीही ‘माणगाव भूषण’ पुरस्कार देऊन सहा गुणवंतांना दीपसंध्या या कार्यक्रमात गौरविण्यात आले. सामाजिक कार्यात वैशिष्ट्यपूर्ण समाजसेवा करणार्या गुणीजनांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. गौतम राऊत- वैद्यकीय सेवा, चिमणलाल मेथा- शिक्षण, संतोष खाडे- कोरोना समाजसेवा, ओम सुर्वे- क्रीडा, रजनी मढवी- कोरोना समाजसेवा, तृणाली शाह- अंतराळ संशोधन, पूजा सोंडकर- संगीत यांना माणगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व गुणवंतांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पुरस्कार प्रेरणादायी असतात. त्यामुळे समाजात काम करताना नवीन ऊर्जा मिळून उत्साह वाढतो. आम्ही घेतलेली मेहनत फलद्रूप झाली आहे. कोरोना या कठीण प्रसंगी जीव धोक्यात घालून काम केले. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले. गरीबांना मदत करता आली याचे समाधान आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात काम करण्यासाठी ताकद आणि बळ मिळाले, अशी प्रतिक्रिया माणगाव भूषण पुरस्कार विजेते संतोष खाडे यांनी दिली. यावेळी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे, खरवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मानकर, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, नगरसेवक सचिन बोंबले, कार्यकारी अधिकारी संतोष माळी, सेक्रेटरी कृष्णा गांधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर, नितीन बामगुडे, डॉ. आबासाहेब पाटणकर, अॅड. विनोद घायाळ, नगरसेवक सुनील पवार, विरेश येरुणकर, धनाजी जाधव, मनिषा मोरे, निशिगंधा मयेकर, दिलीप उभारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.