जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवडणुकीनंतर निवड चाचणी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन रेंगाळल्यानंतर आता जागतिक कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीवरून गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक येत्या 12 ऑगस्ट रोजी होणार असून त्यानंतर ही निवड चाचणी आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. भारतीय ऑलिंपिक समितीच्या डहॉक समितीने आपली जबाबदारी झटकली असून त्यांच्याकडून ही जबाबदारी निवडणुकीनंतर निवडून येणार्‍या नव्या कार्यकारिणीवर सोपवण्यात आली आहे.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन बेलग्रेड येथे 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नाव नोंदवण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक 12 ऑगस्टला होणार आहे. याचा अर्थ नव्या कार्यकारिणीला जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा अवधी मिळणार आहे. हा अवधी कमी दिवसांचा असणार आहे.

Exit mobile version