पेण -दिवा रेल्वे सुरू न केल्यास आत्मदहन – योगेश म्हात्रे

। हमरापूर । प्रतिनिधी ।
पेण रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल मेमु ही प्रवासी शटल रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तसेच पेण व रोहा स्थानकातून इएमयु किंवा मेमु ही छत्रपती शिवाजी टर्मिनल व दादर, ठाणे, कल्याण, दिवा, वसई रोड व डहाणू रोड ही प्रवासी रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्याचे निवेदन मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहे. या निवेदनातून समस्त पेणकरांनी तातडीने ही सेवा सुरू न केल्यास दि.11 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा मी पेणकर, आम्ही पेणकर शाश्‍वत समितीचे अध्यक्ष योगेश म्हात्रे यांनी दिला आहे.

पेणकरांनी आंदोलने, उपोषणे केल्यानंतर दि.11 नोव्हेंबर 2018 रोजी पेण-पनवेल शटल सेवा सुरू करण्यात आली, मात्र त्यानंतर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्वच रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर ही सेवा देखील बंद झाली होती, मात्र आता सर्व व्यवहार, सर्व सेवा पूर्वपदावर येत असल्याने आता ही बंद ठेवण्यात आलेली शटल सेवा देखील पुन्हा सुरू करण्यात यावी. याचबरोबर पेण स्थानकातून पेण-पनवेल-दिवा व वसई रोड व डहाणू रोड ही प्रवासी मेमु रेल्वे सेवा देखील पुन्हा सुरू व्हावी, पेण- ठाणे ही प्रवासी रेल्वे सेवा शनिवार व रविवारी देखील उपलब्ध व्हावी, अलिबाग रेल्वे मार्ग प्रवासी मार्गासाठी सुरू करण्यात यावा, रोजच्या जलद सेमी व फास्ट, सुपर फास्ट सर्व रेल्वे गाड्यांना पेण स्थानकात थांबा मिळावा आदी मागण्या पेणकर समितीने मध्य रेल्वेकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. या मागण्या मान्य न केल्यास आम्हाला रेल्वेचे प्रवासी म्हणून जो हक्क मिळायला पाहिजे तो आपणाकडून मिळत नसेल तर आम्ही येत्या 11 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा पेणकरांच्या वतीने देण्यात आला आहे.

Exit mobile version