चंद्रोदय, श्री स्वामी समर्थ यांची महिलांत विजयी वाटचाल; सद्गुरू इंटरप्राइजेस, रुबी बिल्डर व्यावसायिक प्रथम श्रेणीच्या दुसऱ्या फेरीत
| मुंबई | प्रतिनिधी |
चंद्रोदय मंडळ, श्री स्वामी समर्थ यांनी महिलांत विजयी वाटचाल सुरू केली. दादर(पूर्व) येथील भवानीमाता क्रीडांगण, शिंदेवाडी येथे सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेतील महिलांच्या उदघाटनीय सामन्यात चंद्रोदय मंडळाने चुरशीच्या लढतीत गोलफादेवी प्रतिष्ठानला 30-28 असे नमवून आगेकूच केली. मध्यांतरातील 16-14 अशा घेतलेल्या आघाडीमुळे हा विजय शक्य झाला. निकिता खैरे, श्रेया हळदणकर यांच्या चतुरस्त्र व संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. गोलफादेवीच्या संगीता जंगमने एकाकी लढत दिली.
![](http://krushival.in/grygrars/2023/10/dinesh-2-1024x682.jpg)
दुसऱ्या सामन्यात श्री स्वामी समर्थने साक्षी गिलबिले, दिपाली पालव यांच्या चढाई – पकडिच्या सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर शताब्दी स्पोर्टस्चा 35-26 असा पाडाव केला. शताब्दीच्या अनु यादवने कडवी लढत दिली. आमदार मनीषा कायंदे यांच्या हस्ते महिलांच्या स्पर्धेचे उद्घाटन झाले.व्यावसायिक प्रथम श्रेणी गटात सद्गुरू इंटरप्राइजेस् ने आर.बी.एस.सी.चा 40-22 असा सरळ पराभव केला. रुपेश जाधव, संतोष ठाकूर यांच्या उत्कृष्ट खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. पराभूत संघाचा आयेश गुरव चमकला. दुसऱ्या सामन्यात रुबी बिल्डरने रुपाली ज्वेलस् वर 33-28 असा विजय मिळविला. दिनेश चव्हाण रुबी कडून, तर साहिल पाटील रुपाली कडून उत्तम खेळले. कुमार गटाच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात गोलफादेवीने गुड मॉर्निंग वर 45-26 अशी सहज मात केली. ओमप्रकाश पासवान, विनय लाड यांचा चढाई – पकडीचा खेळ या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. दुसऱ्या सामन्यात श्रीराम क्रीडा विश्वस्त ने शताब्दी स्पोर्टस् ला 32-21 असे नमवित तिसरी फेरी गाठली. भावेश महाजन, आदित्य पार्ले यांच्या अष्टपैलू खेळाने श्रीरामने ही विजयाची किमया केली. शताब्दीच्या साहिल कदमने शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो कमी पडला.