नेरळ रेल्वे स्थानकातील सेल्फी पॉईंट अंधारात

| नेरळ । वार्ताहर

नेरळ रेल्वे स्थानकात माथेरान कडे जाणार्‍या नॅरोगेज मार्गाच्या बाजूला मध्य रेल्वे प्रशासनाने सेल्फी पॉईंट विकसित केला आहे. मिनीट्रेनचे जुने इंजिन आणि त्या बाजूला आय लव्ह नेरळ अशी नावे असलेला सेल्फी पॉईंट वीज प्रवाह खंडित झाल्याने बंद अवस्थेत आहे.

नेरळ माथेरान नेरळ या शंभर वर्षे जुन्या मिनीट्रेनसाठी वापरलेले इंजिन नवी दिल्ली येथील रेल भवन मध्ये संग्रही म्हणून ठेवण्यात आले आहे. त्याचे जुने असलेले इंजिन काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वेकडून नेरळ स्थानकात देखील नॅरोगेज मार्गिकेच्या बाजूला ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी माथेरानला जाणारे पर्यटक मिनीट्रेनच्या इंजिनासोबत फोटो काढतात. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने दोन वर्षपूर्वी तेथे आय लव्ह नेरळ असा पॉईंटचा बोर्ड बनवून लावला. रात्रीच्या अंधारात आकर्षक विद्युत रोषणाई मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा तो सेल्फी पॉईंट मागील काही वर्षे अंधारात आहे. त्या सेल्फी पॉईंटमधील वीज पुरवठा यंत्रण बंद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रात्री अंधाराचे साम्राज्य असून लोकल मधून उतरणार्‍या प्रवाशांसाठी आकर्षण असायचे ते नाहीसे झाले आहे.

त्याबद्दल नेरळ प्रवासी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांसाठी नेरळ स्थानकात मनोरंजनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे नेरळ प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. आय लव्ह नेरळ हे सेल्फी पॉईंट लवकरात लवकर दुरुस्त करून कार्यन्वित करण्यात यावे, अशी मागणी नेरळ प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर, तसेच अन्य पदाधिकारी राजेश गायकवाड, मिलिंद विरले, आबा पवार यांनी केली आहे.

Exit mobile version