म्युझिक फेस्टिवलच्या नावाखाली मद्यविक्री?

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने कार्यक्रम

| दीपक घरत | विशेष प्रतिनिधी |

पालिका हद्दीतील खारघर वसाहतीत 22 आणि 23 नोव्हेंबरदरम्यान ‌‘रोलिंग लाऊड इंडिया म्युझिक फेस्टिव्हल‌‘चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जगातील सर्वात मोठा हिप-हॉप महोत्सव भारतात साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान मद्य विक्रीचे स्टॉल लावण्यासाठी परवानगी मागण्यात आल्याने यावरून खारघर वसाहतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वसाहतीत कोणत्याही प्रकारची मद्य विक्री करणारी दुकान सुरु होऊ नये, याकरिता प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांकडून कार्यक्रमाला विरोध दर्शवला जात आहे.

मियामी ते लॉस एंजेलिस, लॉस एजेंलीस ते पोर्तुगाल आणि पोर्तुगाल ते थायलंड, रोलिंग लाऊड हे हिप-हॉप संस्कृतीचे जागतिक कनेक्टर आहे, ही संस्था आंतरराष्ट्रीय सुपरस्टार आणि स्थानिक प्रतिभा एकाच मंचावर एकत्र आणते. खारघर येथील कार्यक्रमादरम्यान दररोज सुमारे 25,000 लोकांची उपस्थिती कंपनीच्या माध्यमातून अपेक्षित पकडण्यात आली आहे. याकरिता मंडप उभारण्याची परवानगी सिडकोकडून मागण्यात आली आहे. सिडको व्यवस्थापनाकडून अटी आणि शर्थींची पूर्तता करण्याच्या अटीवर ही परवानगी दिली आहे. मात्र, कार्यक्रमासाठी वाहतूक विभाग, पनवेल पालिका परवाना विभाग तसेच अग्निशमन दलाची परवानगी आवश्यक आहे. त्याच सोबत मद्य विक्रीचे स्टॉल उभारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे असताना कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कंपनी कडून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवानगीसाठी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नसल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच मंडप उभारण्यासाठी पनवेल पालिकेकडूनदेखील कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
खारघर वसाहतीत कोणत्याही प्रकारच्या मद्य विक्री करण्याला परवानगी देण्यात येऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे. काही सामाजिक संस्थादेखील याकरिता आग्रही आहेत. अशा वेळेला एका मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी सामान्य खारघरकर नागरिक करत आहेत.

अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत आमच्या विभागाकडे कोणत्याही प्रककारचा अर्ज अद्यापही दाखल करण्यात आलेला नाही.

-रविकिरण कोळे,
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रायगड.

कार्यक्रमाविरोधात पक्षातील काही माजी नगरसेवकांकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. आयोजकांकडून कायमस्वरूपी मद्य विक्री केली जाणार नसल्याने जनभावनेचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे.

-प्रशांत ठाकूर,
आमदार, पनवेल

Exit mobile version