| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथे जैवविविधता हानी आणि हवामान बदल या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रयत्नात, जैवविविधता आणि पर्यावरण-आधारित हवामान बदल अनुकूलन यावर लक्ष केंद्रित करणारे चर्चासत्र आगा खान एजंसी फॉर हॅबिटाट इंडिया तर्फे हॉटेल मॅपलायव्ही येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये या विषयावरील तज्ञ, भागधारक आणि समुदाय सदस्य एकत्रित आले. जैवविविधता जतन करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोन या चर्चासत्रातून सहभागींना मिळाला.

या चर्चासत्राच्या उदघाटन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अलिबाग प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे , टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल साइंसेसचे प्रा. महेश कांबळे, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटाट इंडियाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा आदी मान्यवर उपस्थित होते. उदघाटनानंतरच्या दोन सत्रांमध्ये डॉ. सतीश ठिगळे (भूगर्भशास्त्रज्ञ), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र विभागाचे माजी प्रमुख दत्ताराम गोंधळी, सोशल अँड डिजास्टर मैनेजमेंट असोसिएशनचे डॉ. निलेश चांदोरकर, डॉ किरण माळी, जयवंत गायकवाड या मान्यवरांनी मांडणी केली.

या चर्चासत्रामध्ये जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदल अनुकूलन यांच्यातील परस्परसंबंध, प्रभावी धोरणे अंमलात आणण्यासाठी सरकार, गैर-सरकारी संस्था, स्थानिक समुदाय आणि इतर भागधारक यांच्यात सहयोगी प्रयत्नांच्या गरजेवर भर, जैवविविधता संवर्धन प्रयत्नांसाठी प्राधान्य क्षेत्रांची ओळख; पर्यावरणीय बदल, शाश्वत शेती यांसारख्या पर्यावरणीय बदल अनुकूलनासाठी निसर्ग-आधारित उपायांचा शोध या ठळक बाबींंवर चर्चा करण्यात आली. जैवविविधता हानी आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ठोस कृती करण्याची आपली वचनबद्धता सहभागींनी व्यक्त केली.