पीएनपी नाट्यगृहात कोव्हिड 19 वर चर्चासत्र

कोरोना ही शापित पर्वणी – डॉ. चांदोरकर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कोरोना ही शापित पर्वणी असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष बालरोग तज्ज्ञ डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी केले. पीएनपी वरिष्ठ महाविद्यालय, वेश्‍वी-अलिबाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा रोटरी क्लब, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हिड 19 ः काल, आज आणि उद्या या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात डॉ.चांदोरकर यांनी कोरोना काळातील वैद्यकीय भूमिकेसंदर्भातही माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोनाचा लहान वयोगटातील मुलांवर कमी प्रमाणात परिणाम झाला. कारण ते प्रमाण सौम्य होते. पण जर कोरोना रुग्ण वाढले तर त्या रुग्णासाठी अलिबागमध्ये हॉस्पिटल नव्हते. यामुळे परिस्थितीभावी या रुग्णांना मुंबईकडे रवाना करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय या संदर्भात 60 हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देत असंख्य रुग्णांना बरे केले असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. तर 15 ते 18 वयोगटातील मुलामुलांचे लसीकरण करण्यात येत असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही डॉ.चांदोरकर यांनी केले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे यांनी प्रसूतीबाबत, प्रसूती नंतर घेतलेली विशेष काळजी काळजी याबाबत विश्‍लेषण केले. तर गरोदर स्त्रियांमध्ये लस घ्यावी की नाही, हा संभ्रम होता. पण लस घ्यावीच असा आम्ही सर्व डॉक्टरांनी सल्ला दिला होता. लस घेतल्यामुळे अपत्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे त्यांनी पटवून दिले.
याशिवाय, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांनी कोरोनाचा लोकांच्या मानसिकतेवर कशा प्रकारे त्याचा परिणाम झाला हे नमूद केले. कोव्हिड फोबिया याबाबत माहिती देताना लोकांनी कोरोनासंदर्भातील संभ्रम दूर ठेवण्याचे आवाहन केले. तर कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता हृदय रोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. सचिन जायभाई यांनी प्रतिपादीत केली. तसेच रक्तपेढी तज्ज्ञ डॉ.दीपक गोसावी यांनी सिटी व्हॅल्यूबाबत माहिती दिली.
पीएनपी नाट्यगृहात संपन्न झालेला हा कार्यक्रम कोव्हिड नियमांचे पालन करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात आला. या कार्यक्रमास रायगड आरोहेड लॅब सर्विसेस संचालक मंगेश रानवडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, सत्राचे अध्यक्ष डॉ. ओमकार पोटे, प्रा. नम्रता पाटील, शेकापचे पुरोगामी युवा संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र पाटील, प्रा. दिनेश पाटील तथा शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निवेदकाची जबाबदारी मंगेश रानवडे यांनी पार पाडली.

Exit mobile version