रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी -शोअरचे आयोजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी-शोअर आयोजित इन्व्हेस्टमेंट-गुंतवणुकीचे गणित या विषयावरील चर्चासत्र अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृह येथे पार पडले. कोव्हीड 19 च्या पँडेमिक नंतर प्रत्येकाने आपली भविष्यातील आर्थिक गुंतवणूक कशी करावी हा चर्चेचा गाभा होता. या सोहळ्यात गुंतवणूक व आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती. इक्वीटी/शेअर्स, म्युच्युअल फंडस्, गोल्ड, करंसी, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट तसेच एफ डी, आर डी, इन्शुरन्स, पेन्शन स्कीम्स इत्यादी विषयांवर एक्स्पर्ट फॅकल्टीजनी आपापले विचार मांडले.
चर्चासत्र चालु होण्यापूर्वी मुंबईहून खास निमंत्रित केलेले गुंतवणूक गुरु व फायनान्स एक्स्पर्ट मनोज गुप्ता यांनी सुयोग्य गुंतवणूक या विषयावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या आधारे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं व्याख्यान सादर केलं. त्यानंतर चर्चासात्राची सूत्रे रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ राजेंद्र चांदोरकर व फायनान्स एक्स्पर्ट रोहित गोखले यांनी आपल्या हाती घेतली. चर्चासत्रात रिअल इस्टेट एक्सपर्ट रो. शेखर वागळे यांनी जमीन, फ्लॅट व गाळा इत्यादी मधील गुंतवणूकीचे बारकावे शेअर केले, रो. अनघा साडविलकर यांनी म्युच्युअल फंड्स, एफ डी, इन्शुरन्स, पेन्शन प्लॅन्स इत्यादीविषयी आपली मतं व्यक्त केली तर रोहित गोखले यांनी चर्चासात्राचा गोषवारा/सारांश उपस्थिताना अगदी सोप्या भाषेत सादर केला.
एफ डी, आर डी, इन्शुरन्स, पेन्शन प्लॅन्स असे पारंपरिक बचतीचे प्रकार कालबाह्य होत असताना सर्वांनी म्युच्युअल फंड्स, डेट फंड्स, इक्वीटी शेअर्स, गोल्ड, रिअल इस्टेट तसेच फॉरेन करंसी इत्यादी आपल्या व्यक्तिगत गरजांना साजेशी इन्व्हेस्टमेंटची निवड करावी असे मत रोटरी क्लबचे अध्यक्ष बालरोगतज्ञ डॉ राजेंद्र चांदोरकर यांनी व्यक्त केले.