ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

। मुंबई । वृत्तसंस्था ।

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही झळकले आहेत. अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती. वेगवेगळ्या भूमिकांसाठी जयंत सावरकर यांची ओळख होती. त्यांनी विनोदी, गंभीर भूमिकांमधून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या 15 दिवसांपासून जयंत सावरकर यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले. पण नंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं. जयंत सावरकर यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात निर्माण झालेली पोकळी ही भरुन न येणारी आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर उद्या (दि.25) अंत्यसंस्कार होणार आहेत.

Exit mobile version