| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा झाला. हा सर्व कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ, श्रीवर्धन आणि तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
दीप प्रज्वलनानंतर सुनिल चिटणीस यांनी बासरीवर ‘जीवनात ही घडी’ हे गीत वाजवून स्वागत केले. सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष नरेश पुलेकर यांनी केले. समितीच्या वतीने प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी, अॅड. मंदार ठोसर, अॅड. अतुल चौगुले, अॅड. संजीव डेगवेकर आदिंचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. डॉ.श्रीनिवास जोशी यांनी सध्याची जीवन पद्धती आणि ज्येष्ठांबद्दलची समाजाची कर्तव्ये यावर प्रकाशझोत टाकला तर आमंत्रित विधीज्ञांनी ज्येष्ठ नागरिक कायदा व त्यांच्यासाठीच्या योजना यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात वयाची 85 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ सभासदांचा शाल-श्रीफळ देऊन उचित सत्कार करण्यात आला.
श्रीवर्धन दिवाणी न्यायालयाच्या न्या.सोनाली जवळगेकर या स्वतः संयोजकांच्या आमंत्रणावरुन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. त्यांचा सन्मान रोहिणी क्षीरसागर यांनी केला. न्या.जवळगेकर यांनी उपस्थितांनी विचारलेल्या काही प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली. एवढेच नव्हे तर आपण पुन्हा एकदा वेळ काढून एकत्र जमून ज्येष्ठांच्या शंकांचे निरसन करु, त्यांच्याविषयीच्या कायद्यांची माहिती जाणून घेऊ असेही आश्वासित केले. सूत्रसंचालन नंदा जोशी यांनी तर दिलीप हेंद्रे यांनी आभार मानले.