इतिहासप्रेमाचा अद्भुत नमुना
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळ आणि पनवेल ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी किल्ले रायगड येथे ज्येष्ठांची सहल उत्साहात पार पडली. या सहलीचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक सुधाकर लाड यांनी मार्गदर्शन केले.
70 ते 90 वयोगटातील ज्येष्ठांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर रायगडाची चढण सहज पार केली. अवघड चढ-उतार, पायऱ्यांची दमछाक आणि शारीरिक थकवा यांना न जुमानता ज्येष्ठांनी छत्रपतींच्या इतिहासातून प्रेरणा घेत प्रवास अधिक आनंददायी केला. सहल दरम्यान किल्ल्यावरील सिंहासन जागा, राजवाडा, हिरकणी बुरुज, मेघडंबरी, गंगासागर तलाव, नगारखाना, राण्यांचे महाल, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी, वाघ्या कुत्र्याची समाधी यांसारख्या ऐतिहासिक वास्तू पाहताना ज्येष्ठांचा उत्साह दुणावला. सुधाकर लाड यांनी त्यांच्या प्रभावी कथनातून रायगडचा भूतकाळ जिवंत करून दाखवला. सहली दरम्यान बी.पी. म्हात्रे, दत्तात्रय जाधव, काशिनाथ जाधव आणि मकु यांनी विशेष योगदान दिले. बसमध्ये मकु, वसुधा, नवाळे, सुलोचना कल्याणकर आदी ज्येष्ठांनी गीत-संगीत, कविता यांमुळे वातावरण रंगतदार केले. खाद्यपदार्थांची रेलचेल आणि आनंदी गप्पांमुळे प्रवास अधिक रंगला. ज्येष्ठांनी यावेळी रायगड रोप-वेचा थरारक अनुभवही घेतला. सकाळी सहा वाजता निघालेली सहल रात्री दहाच्या सुमारास संपली आणि सर्व ज्येष्ठ आनंदाने घरी परतले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, अभिमान आणि इतिहासाशी झालेल्या साक्षात्काराचा वेगळाच आनंद दिसत होता.
