। पनवेल । वार्ताहर।
पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या भामट्यांनी एका दिवसामध्ये पनवेल व खारघर या भागातील दोन ज्येष्ठ नागरिकांजवळचे तब्बल लाखो रुपये किमतीचे दागिने लुबाडल्याची घटना घडली आहे. या तोतया पोलिसांविरोधात पनवेल शहर, खारघर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
पनवेलच्या बावन बंगलो येथे राहणारे नरेश मिराई (73) हे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. या वेळी दोघा भामट्यांनी सीआयडी अधिकारी असल्याचे भासवून बाहेर भुरटे चोर फिरत असल्याचे सांगून घाबरवत अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. नरेश मिराई यांनी सोन्याची चेन तसेच दोन अंगठ्या काढल्यानंतर हे दागिने त्यांच्या खिशात ठेवण्याचा बहाणा करून दागिने काढून घेत ते दुचाकीवरून पसार झाले. तर दुसऱ्या घटनेत सातारा येथे राहणारे विश्वनाथ कदम (78) हे खारघर येथे राहणाऱ्या मुलाकडे काही दिवसांपूर्वीच आले होते. ते घराबाहेर फिरायला गेले होते. ते खारघर सेक्टर-7 मधील जीएसटी कॉलनी रोडने पायी चालत जात असताना, तिघा भामट्यांनी पोलीस असल्याचे भासवून त्या भागात चोऱ्यामाऱ्या होत असल्याचे सांगून त्यांना अंगावरील दागिने काढण्यास सांगून त्यांनी हातातील सोन्याची अंगठी काढली असता, तोतया पोलिसांनी हातचलाखी करून त्यांची अंगठी चोरून पलायन केले.






