ज्येष्ठ कम्युनिस्ट व कामगार नेते महेंद्र सिंह यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ कम्युनिस्ट आणि कामगार नेते महेंद्र सिंह यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने डाव्या व कामगार चळवळीचा महत्त्वाचा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. साधी राहणी, कडवी तत्त्वनिष्ठा, जबाबदारीची तीव्र जाणीव, कष्ट घेण्याची तयारी, अत्यंत प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, आणि वरून कडक दिसणारा पण आतून प्रेमळ असणारा स्वभाव असणारे महेंद्र सिंह हे सच्चे कम्युनिस्ट नेते होते. त्यांच्या निधनाने पक्षाची व कामगार चळवळीची हानी झाली असल्याची शोक प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माकपचे राज्य सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली आहे. महेंद्र सिंग यांच्या निधनावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व इतर डाव्या-पुरोगामी पक्ष संघटनांनी शोक व्यक्त केला आहे.

१९७०च्या दशकात कम्युनिस्ट नेत्यांवर, चळवळीवर होणाऱ्या शिवसेनेच्या हल्ल्याविरोधात व त्यानंतर काँग्रेसच्या केंद्र सरकारच्या आणीबाणीच्या हल्ल्याविरोधात माकपच्या लढ्यात महेंद्र सिंह यांचे महत्त्वाचे योगदान होते. महेंद्र सिंह यांच्यावर १९८५ साली अरिस्टोक्राट कंपनीच्या मालकांच्या गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. अनेक दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. माकपच्या मुंबई सचिवपदी महेंद्र सिंह यांची १९९४ साली निवड करण्यात आली. त्यांनी २०१५ पर्यंत ही जबाबदारी पार पाडली. डावी चळवळ क्षीण होत असताना मुंबईत माकप व जनसंघटनांचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. वर्ष २०१५ साली विशाखापट्टनमच्या राष्ट्रीय अधिवेशनात माकपच्या केंद्रीय कमिटीवर त्यांची निवड झाली होती.

डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या डाव्या विचारांच्या युवक संघटनेचे १९८६ साली मुंबईत पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन झाले. त्यात संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष म्हणून डॉ. विठ्ठल मोरे आणि संस्थापक राज्य सरचिटणीस म्हणून महेंद्र सिंह यांची निवड झाली होती.

Exit mobile version