हृदयद्रावक! बारावीत लेकीचा पहिला नंबर आला पण…

। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
वर्षभर अभ्यास करुन तिने बाबांचे स्वप्न पूर्ण केले. तिचा बारावीच्या परिक्षेत पहिला नंबर आला; मात्र निकालाच्या पूर्वसध्येलाच तिच्या बाबांचे निधन झाले. त्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोगर कोसळला. या घटनेने केवळ सुधागड तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एकीकडे वडिलांची अंत्ययात्रा आणि दुसरीकडे तिचा बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत तिने तिच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. मात्र मुलीचे हे यश पहायला वडील नव्हते. किंबहुना वडिलांच्या निधनाने त्या मुलीनेही तिचा निकाल पाहिला नव्हता.

सुधागड तालुक्यातील हातोंड येथील रहिवासी, सम्यक क्रांती विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते व सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार मंगेश वाघमारे यांचे मंगळवारी (ता.7) रात्री अपघाती निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी (ता.8) दुपारी काढण्यात आली. याचवेळी बारावीचा निकाल जाहीर झाला. वाघमारे यांची मुलगी विदीशा हिने पालीतील ग.बा. वडेर हायस्कुल व व. ग. ओसवाल कनिष्ठ महाविद्यालयातून कला शाखेतून प्रथम क्रमांक मिळविला. तिला तब्बल 83.67 टक्के गुण मिळाले. मात्र मुलीचे हे यश पाहण्यासाठी वडील हयात नव्हते.

एकीकडे बारावीचा निकाल आणि दुसरीकडे वडिलांची अंत्ययात्रा अशी विलक्षण परिस्थिती तिच्यावर ओढावली होती. यामुळे तिच्या शिक्षकांसह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. आपल्या मुलीने खूप शिकावे, यासाठी मंगेश वाघमारे खूप प्रयत्नशील होते. नियमित ते मुलीला कॉलेजमधून न्यायला व आणायला येत असत. मात्र मुलीचे हे यश त्यांना पहायला मिळाले नाही. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version