। सातारा । प्रतिनिधी ।
सातार्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असं आंदोलन केले. यावेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी त्यांना पिपरंद (ता. फलटण) राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेतले.
आंदोलनादरम्यान करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला. आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.
बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसे झाले होते विचारा? असेही ते म्हणाले. तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचे नाव सांगा असे आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिले होते. तसेच आपण नावे घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितला तर सिद्ध करु शकतो असेही म्हणाले.